मनवाणीच्या पलीकडे तव महिमा श्रुति नेणती
मग कोणी कशि करावी स्तुती, तव गुण विविध किती ?
कसे, कुणी वर्णावे तुजला समर्थ नच कोणी
तरिही सर्वहि मने जडति रे तुझ्या पदस्थानी || २ ||
मध-माधुर्ये भरलेली ही अमृततुल्य वाणी
निर्मिसि तू, ही विस्मयकारक नच ब्रह्मवाणी +
गुणकथने तव, पवित्र व्हावी मम वैखरि आता
हेतु फक्त हा एकचि आहे, तू बुद्धिदाता || ३ ||
( + ब्रह्मवाणी अशी आहे की, "मधासारखी मधुर, अशी वेदवाणी तू निर्माण केलीस", हे सत्यच आहे.)
वेदांनी वर्णिले तव कधी माहात्म्य संसारी
सत्त्व-रज-तमे उत्पत्तीसह, रक्षिसि, संहारी
करिति अज्ञजन देउनि दोषां कोलाहल तो कसा
महिमा नेणुनि, नास्तिक माणुस मान हलवितो जसा || ४ ||
कशापासुनी, कशी, का, करी विश्वाची निर्मिती
घटा निर्मितो कुंभार जसा मूळ मात्र माती
नसलेल्या ईश्वरा तुम्ही हो कराल सिध्द कसे ?
असे, मोहमय कुतर्क करिती मूढ निरर्थकसे || ५ ||
कर्त्यावाचूनि उत्पत्ति जगी नसे होत कधिही
स्वदेहरचना नसे ठावुकी पूर्ण मनुष्या कधी
भुवनांची रचना करण्याहा समर्थ शिव पात्र +
संशय तुजियावरती दाविती इथे मूढ मात्र || ६ ||
( + सक्षम )
वेद, याग, शैवागम, नाना शास्त्रीं रुचि लोकी
युक्तायुक्त न जानति तरि कुणि भक्तिच करितो की
आकाशातुनि पडे तोय, परि अनेकविध मार्गी
सागरीच त्या जाणे हितकर,तैसा तू स्वर्गी || ७ ||
चिदानन्द परमात्मस्वरूपी रमला जो देव
त्या नच रतिभर गरजचि कसली, "समृद्धि" त्या ठेव
नन्दी, परशू, गजचर्म, तुला भले नर-कपाल
चिताभस्म सर्पाने शोभसि, तूचि लोकपाल || ८ ||
कोणी शाश्वत, कुणी अशाश्वत, विश्वाला मानिती
काही शाश्वत, काहि अशाश्वत, असेहि कुणि माण्डिती
भिन्न मते मी जरि गोन्धळलो तरी तुला स्तवितो
धाडस नच हे, मज आवडते, बडबड मी करितो || ९ ||
मापाया तुज, तेज:पुन्जा! ब्रह्मदेव ही उणा
महाविष्णुही पुरा न पडला, कळसी तू कोणा ?
भक्तिविणा तू देसि न कोणा तव साक्षात्कारा
सेवेने पावतो देव तो झणि ये आकारा || १० ||
कन्डु न शमता, रावण झाला त्रिभुवनसम्राट
तुझ्या कृपेने सदाशिवा! रग उरे वीस हात
नऊ मस्तके तव चरणाशी अर्पियली रावणे
भक्तिभाव करि रावणअंगी सामर्थ्या थांबणे || ११ ||
तुझ्या कृपेने समर्थ झाला परि उलटे तुजवरी
कैलास नगा उचलूनि टाकी, शक्ती वीस करी
आपण दाबून धरिला पर्वत पादांगुष्ठाग्रे
पाताळीही स्थिर नच होई, रावणमद भंगे || १२ ||
त्रिलोक्या बाणासुर बनवी दास, सहज कैसा
इन्द्रा लाजवि, आश्चर्य नसे, तुझा प्रसाद हि तसा
तवचरणी जो विनम्र होई मस्तक नमवूनी
उन्नति त्याची व्हावी न कशी ? सत्य सत्य मानी || १३ ||
समुद्रमन्थनकालि जहर जे ब्रह्माण्डा जाळी
कृपावन्त होवुनी सदाशिव प्रलयकाल टाळी
प्राशन करुनी जहराचे, तव कंठ निळा झाला
डाग नव्हे, भूषणची होते हित जपणाराला || १४ ||
देव, दानवा आणि मानवा हरवी नित मदन
तुजही तैसा भोळा मानुनि सोडियला बाण
केवळ तव दृष्टिक्षेपाने मदन दग्ध झाला
जितेन्द्रिय महादेव नच कधी फसे मोहजाला || १५ ||
तांडवनृत्या करिसी जेव्हा जगकल्याणार्थ
पदाघात तव भयचकित हि करि, नुरे जणू अर्थ
जटाताडने गरगर फिरतो स्वर्गलोकही खरा
नक्षत्रासह अन्तरिक्षही कापतसे थरथरा || १६ ||
हेतु तव कधी कळणे, मनुजा शक्य नसे मुळिही
प्रभुत्व तव आगळे वेगळे, अशी ज्ञान मुळिही
आकाशी पसरला फेनजो तारान्गण योगे
प्रचण्ड गंगाजल प्रवाहहि बिन्दु जसा शोभे
जटेतल्या या बिन्दुनेच जग द्वीपाकार दिसे
दिव्य शरिर तव अगडबम्ब हे, असे केवढे, कसे || १७ ||
त्रिपुरासुर तृण जाळण्याकिती खटाटोप केला
रथ भूमीचा, सारथि ब्रह्मा, मेरु धनुष्याला
चन्द्रसूर्यही तव रथचक्रे, विष्णु शरस्थानी
तव इच्छाही क्रीडा करते मुक्त पदार्थानी || १८ ||
त्रिपुरहरा! तुज विष्णु पूजिता सहस्र कमलानी
भक्तपरीक्षेसाठि लपविले कमल एक पानी
सहस्र संख्यापूर्ती करण्या, विष्णु नेत्र उपटी
प्रसन्न होउन चक्ररूप तू धरिसी त्या हाती || १९ ||
फल देण्यासी जागृत असशी, शिवा! यज्ञकर्त्या (ला )
तुझ्या कृपेवाचुनी फळ मिळे कसे ? विघ्नहर्त्या ? (हे )
सर्व श्रौत स्मार्ती यज्ञी फलदाता तूची
वेदांच्या वचनावरि श्रद्धा दृढ या भक्तांची || २० ||
सर्व रक्षका! भक्ति श्रद्धापूर्वक कर्म फळे
श्रद्धा नसता अनर्थ होतो फळ ते दूर पळे
दक्ष सदा जो दक्षप्रजापति त्रिकालज्ञही मुनी +
सदस्य देवहि सगळे असुनी यज्ञ जाइ नासुनी
यज्ञफळाचे दान हेच जे व्यसन महादेवा
तयानेच विध्वंस करावा सफल कसा व्हावा || २१ ||
( + पार्वतीचा पिता दक्ष याने जामात महादेवाना टाळून यज्ञाला आरंभ केला. पतीचा सल्ला न ऐकता पार्वती माहेरी गेली. दक्षाने तिचा अपमान केला. पार्वतीने यज्ञात आत्माहुती दिली. शंकरानी यज्ञाचा विध्वंस केला.)
स्वकन्येस पाहुनिया ब्रह्मा जघि मोहित झाला
मृगरूप घेवुनि सन्ध्या धावे, शीलरक्षणाला
क्रोधित होउनि जगंनियन्ता सोडी तीक्ष्ण बाण
भया पावुनी ब्रह्मा धावे स्वर्गलोकि जाण || २२ ||
तथापि अजुनिहि आवेगचि तो तसाच दिसतो कसा ?
मृगापाठी तो शर तव अजूनहि दिसे धावतो जसा
वृथाभिमाने मदन तुज्यावरि करि शरसन्धान
तृणासमचि तू जाळिलेस त्या क्रोधित होऊन
वामान्की पार्वती जरी, नसे महादेव भोला
स्त्रैण म्हणे तुजला तरि या स्त्रिया अशा भोळ्या || २३ ||
स्मशानि राहसि, पिशाच्च जोडिसि, चिताभस्म उटणे
गळयात मृत-नर-कपाल-माला, दिसे किळसवाणे
तरी तुझे स्मरणही वरद रे, शिवभक्तासाठी
मंगल करणे अमंगलाते प्रिय नित तुजसाठी || २४ ||
योगीजन प्राणायामादि करुनि हर्ष पावती
ह्रत्-कमली मन करोनिया स्थिर आनंदे रमती
अमृतडोहि त्या तत्वदर्शने होई आल्हाद
त्या आनन्दालाच म्हणावे "शिव शिव" हा नाद || २५ ||
सूर्य तूच, चन्द्र तूच, वायू ,अग्नी, जल, तूची
पृथ्वी तू, आत्माही तूची आकाशहि तूची
वर्णिती बुधजन तुला असे परि आम्हा न कळे रे
तुझियावाचुनि तत्व एक ही आढळेल का रे ? || २६ ||
तीन अवस्था, तीन वेदरे, भुवने ही तीन
तीन वर्ण ओंकाराचेही होति तिथे लीन
सर्वच हे तव, करिती वर्णन समस्त व्यस्तहि तू
व्यक्तिरूप परमात्मा तूची समाजपुरुषहि तू || २७ ||
सहमहान, भव, शर्व, पशुपती, रुद्र, भीम, ईशान
ओंकारासारखीच नावे पवित्र वेदाहून
याच कारणे प्रिय मज असशी आनंदाचा ठेवा
तू चैतन्यस्वरूप असशी, नमस्कार देवा ! || २८ ||
दूर असशी तू जवळहि तूची महान तू लघुही
हे कामान्तक! तूचि त्रिनयना! वृध्द, युवक, तूही
सर्व रूपी तू, नमस्कार तुज करणे, मज बरवे
वाटतसे, कल्याणप्रद हे, वासनेस नुरवे || २९ ||